Saturday, June 11, 2011

चांदणे पांघरलेले आकाश

आनंद उवाच...............

चांदणे पांघरलेले आकाश
मागुन कधीच मिळत नसते,
दुसऱ्याला आशाकिरण देणारा,
सूर्य आपण व्हावे लागते,

ओल्या मातीचा सुवास
असाच कधी दरवळत नाही,
प्रेमाच्या बेभान वर्षावात स्वत:ला
आधी चिंब भिजवावे लागते,

जेव्हा येतो वसंत बहरात
एक कळी तेव्हाच फुलते,
होतो जेव्हा प्रेमाचा शिडकावा
धुंदीत रहाण्याची गरजच नसते,

हळुच उमटलेला मनातला तरंग
ओठांवर येऊन परत जातो,
जिवलगाला बंधात कायमचे बांधायला
बेफाम खळबळच उमटावी लागते,

मैत्रीच्या नाजुक नात्यावर
येऊ नये कधी नैराश्याचा अंधार,
म्हणुन आनंदाच्या हळुवार क्षणांना
"मैत्रा" साठी नेहमीच मात्र जपावे लागते

तुझे येणे

आनंद उवाच.....................

तुझे येणे असे वसंताची बहर,
फुलुन येई स्वप्नांचा गुलमोहर,

हास्य तुझे खुलवे आसमंत सारा,
फुलुन जाई माझ्या मनाचा पिसारा,

नाचरे भाव डोळयातले तुझ्या,
गोडशी कळ उठवे हृदयात माझ्या,

जवळ नसताना तु, होई जीवाची तळमळ,
मनातल्या मोहोराची सुरु होई पानगळ,

वसुन जा अंतरात जन्मजन्मांतरीसाठी,
प्रत्येक क्षण जगत राहीन तुझ्यासाठी,
फक्त तुझ्यासाठी...................

स्व-शोधन

आनंद उवाच.....................

खोली अथांग डोहाची
काठावर बसुन उमजत नाही,
कृतीशीलतेच्या उड्डाणाविण
क्षितिजसीमा समजत नाही,

पूर्वग्रहांनी अतिमती मात्र
सदैवसा ग्रासलेलाच असतो,
आत्मस्तुती अन अभिमानातच मग्न
अज्ञानकर्दमात फसलेला असतो,

नको समजुस उथळता,
बालपणीच्या अवखळतेला,
समयच देई गंगास्वरुप
अवखळ अल्लड अलकनंदेला,

ज्ञानचक्षु उघडण्यासाठी
पूर्वग्रह असतो मोठा अडसर,
अतीबुद्धीभ्रमास देउन फाटा
घ्यावा "स्व"शोधनाचा प्रत्येक अवसर...................

Wednesday, June 8, 2011

एकटाच उरलो मी

आनंद उवाच.................

आभाळ फाटलेले, विटलेले
टाका भरण्यास फिरलो मी
वाहुन पुसुन गेल्या रेघा,
वाळुत एकटाच उरलो मी

शोधताना धागा सुखाचा
गुंतती शत धागे क्लेशाचे
आयुष्याचे वस्त्र विणताना
कसा नकळे विरलो मी

आसावल्या मनास माझ्या,
माझाच कसा तो राग येई
समजुतींचे गोफ बांधताना,
मध्यान्हीतच पुरा सरलो मी

जगणे हे बंदीशालेसम ,
सारेच रस्ते चुकलेले,
चक्रव्युही जगण्याच्या या
बेभान होऊन शिरलो मी

अपेक्षांचे डोईजड ओझे
अन आठवांचा अनंत लोंढा
गिळुन गेले संपवुन सगळे ,
जाणिव नेणिव विस्मरलो मी

पीडा सांगु कशी कुणाला ,
सारेच गांजले "स्व"त्वात
पचवुन हलाहल मिथ्याचे
होण्यास निळकंठ झुरलो मी

नेमेची उगवे चंद्र हा अर्धाच,
विसरुन चांदणे दुरवर कोठे
ध्रुवशोधाच्या आंधळ्या प्रवासात,
अडखडत धडपडत पुरलो मी...................................................

Monday, April 25, 2011

जगणे

आनंद उवाच..........

जगणे ही पण एक कला असे
साजिरं पीसही सहज शिकवतं
पाचोळ्यात हरवण्यापरीस ते
झुळुकेवर अलगद उडुन दाखवतं


बुडणे ओंजळीतल्या सागरात
जगणे जगणाऱ्याला नसते ज्ञात
अथांग अगम्याचं वेडच वेडं
ते वेडच जगणाऱ्याला जगवतं

चांगल्या वाईट आठवणी
इंधन जगणे जगणाऱ्याचं
अस्तित्वही त्याचं उमलवे कलिका
चित्तधुंदसा सुगंध पसरवतं

Wednesday, April 6, 2011

अडलेच नव्हते

आनंद उवाच.....................................

माझे कधी कुणावाचुन अडलेच नव्हते
अडण्यास मजपाशी काही उरलेच नव्हते

निशांत अवकाश निरंतर जिवलग माझा
प्रकाशित आकाश कधी पुरलेच नव्हते

प्रेमास कुणाच्या होऊ कसा पात्र मी?
"मी" पलिकडे मला काही स्मरलेच नव्हते

आणु कशी खोली जीवनात या माझ्या?
बहरदार काव्यांचे गुंफण कधी स्फुरलेच नव्हते

सुखाचा नवा सदरा कश्यासाठी आणावा?
फाटके नेसुचे अजुन विरलेच नव्हते................

Monday, December 13, 2010

सुखाच्या राशीवर

आनंद उवाच...............

सुखाच्या राशीवर भारावुन सुद्धा
मनमुराद स्वच्छंदी जगता आले पाहीजे
रथ चार अंगुळे आभाळात ठेउन
जमिनीवर मात्र चालता आले पाहीजे

दु:खाच्या डोहात खोल खोल बुडुन
आयुष्य असेच काही संपत नाही
अरिष्टांच्या हलाहलाचे प्याले रिचवुन
निळकंठ होऊन जगता आले पाहीजे

सांडायचा नसतो हा मनाचा कोंडमारा
फुका का दवडावी मनाची सुप्त शक्ती?
भरधाव सोडण्या कर्तुत्वाच्या वारुस
कोंडमाऱ्याचे इंधन करता आले पाहीजे

निधड्या छातीने निर्घृण वार झेलणे
वाट का पहावी या बेफिकीर क्षणांची?
ओळखुन नेमके आपले ते जिवघेणे शत्रु
लढ्यास समोर पाय रोवता आले पाहीजे

Tuesday, November 23, 2010

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय

आनंद उवाच.....................

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझं येणं एक सुंदर पहाटस्वप्न होतं,
आसमंतात तुझं असणंच माझं सर्वस्व होतं,
ते स्वप्नंच आता हळुहळु फाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यासाठी कुठलेही शिवधनुष्य तोडले असते,
तुझ्याचसाठी ते तुटलेले धागेही जोडले असते,
पण नियतीच्या मनात काही वेगळंच घाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यामध्ये माझा "मी" चा निचरा झाला होता,
आपल्या विश्वात तुझ्या स्वजनांचा मात्र कचरा आला होता,
व्यवहारी किल्मिष हळुहळु मनात दुकान थाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

दोनाचे चार कुठे गेले आता शुन्यच येते फक्त बाकी,
पडले ते सुखांचे महाल, उरल्या मोडक्या खिंडारांची झांकी,
सारं गणितच चुकलंय हेच राहुन राहुन पटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

एव्हढा पावसात भिजुनसुद्धा मन पुर्ण सुकलंय,
जुनाट वठलेल्या पिंपळासम धरेपार झुकलंय,
वैषम्याचं विष मात्र हळुहळु साठतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय..................................................

Thursday, September 24, 2009

पहिले प्रेम

पाचवीत असताना मुंबईला आलो. नवी शाळा, पहिलाच दिवस, सगळेच नवे नवे वाटत होते. आईबरोबर शाळेच्या मैदानात उभा होतो. दुर एका कोपऱ्यात ती उभी होती. गर्दीमध्ये सहज लक्ष जाईल असा तेजस्वी चेहरा, सुबक ठेंगणी मनात भरेल अशी मुर्ती. शाळेची घंटा वाजली आणि आईला हात दाखवुन मी माझ्या वर्गाकडे निघालो.सहज मागे वळुन पुन्हा तो चेहरा दिसव म्हणुन त्या कोपऱ्याकडे व्यर्थ नजर फिरवली अन माझ्या वर्गाकडे जाणारा जिना चढू लागलो. पुढे बरेच दिवस पुन्हा काही तो चेहरा दिसलाच नाही. हळुहळु विस्मृतीत जाता जाता एक दिवस अचानक शाळा सुटताना ती पुन्हा समोर आली. आज तिच्याबरोबर तो ही होता. तो माझ्याच वर्गात होता. त्याला तिच्या बरोबर पाहुन बरेही वाटले अन थोडी नाखुशीही. माझी त्याच्याशी अजुन तेवढी मैत्री झाली नव्हती. पण तिला पाहुन आज एक नवी जाणिव झाली होती. ह्रुदय जरा जास्तच धडधडत होते. मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती. मला नक्की अर्थ कळत नव्हता पण सगळेच काही विचित्र अन वेगळेच वाटत होते. जाऊन बोलायचा काही धीर होत नव्हता. पाचवीचे वर्ष असेच संपले. निकालाचा दिवस. वर्गात या वर्षी मी तिसरा आलो होतो. नवा नवा आलो अन तिसरा क्रमांक मिळवला म्हणुन समस्त शिक्षक मंडळी माझ्या आईशी बोलत होते. माझी नजर मात्र ती कुठे दिसते आहे का ते शोधत होती. दुर कुठे तरी मला ती दिसली. पण आईची निघायची घाई. गेलो बापडा घरी. सहावीचे वर्ष असेच गेले नुसतेच दर्शन. कधी दुरुन तर कधी जवळुन ओझरता. पण आतापर्यंत तिचे चित्र मनात पक्के बसले होते. गोरा उभट चेहरा , नाजुक चाफेकळी नाक, घारसर पिंगट डोळे , रेखीव भिवया अन नाजुक जिवणी. जिवाला पार वेडं करुन सोडले होतं. नक्की काय होतय हे कळतच नव्हतं.सातवीत असतांना ओळख झाली. तो बरोबर होताच आणि आयुष्यात पहिल्यांदा मला कुणाशी बोलताना डोळ्यात नजर घालुन बोलणे किती अवघड असते ह्याची जाणिव झाली. पुर्णपणे मोहीत झाल्यावर माणसाची काय अवस्था होते अन बोलताना किती कसरत करावी लागते हे मला तेव्हा जाणवले. हळुहळु ओळख वाढत गेली. "त्या"च्या बरोबर घरी ये हे आमंत्रणही मिळाले. पण तोपर्यंत उमजुन चुकले होते की "ये मामला अपुन के पहुच के बाहर का है". म्हणुन काही मनातली हुरहुर थांबली नाही की भेटण्याची एकही संधी सोडली नाही. कारण त्तिची सर कुणाच्यातच नव्हती. दहावी झाली , आमचे रस्ते विस्तारित जगाकडे वळले अन तो व ती दोघेही विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागले. मध्ये सात आठ वर्षे गेली.

स्टेशनहून येताजाता तिच्या घराशी नजर उगाच रेंगाळायची. एका संध्याकाळी स्टेशनहून बाईकने घरी येत असताना तिच्या घराजवळ मला तो व ती उभे दिसले. तेच रुप अजुन एव्हढ्या वर्षांनी. काही बदल नाही. पुन्हा एक कळ उठली , जुन्या आठवणी जाग्या झाल्या व आपसुकच माझी बाईक त्यांच्याकडे वळली. नमस्कार चमत्कार झाले, त्याच्या इतर चांभारचौकश्या झाल्या. तिने हातात पट्कन लग्नाची पत्रिका ठेवली. आणि माझ्या लग्नाबद्दल चौकशी केली. मी ते बोलायचे टाळण्यासाठी सरळ निरोप घेतला. दोन वर्षापूर्वी पुन्हा स्टेशनजवळ मला ती भाजी घेताना दिसली. थोडासा वयस्कपणा मला पहिल्यांदा दिसला. मला पाहुन तेच चांदणे पसरवणारे ओळखीचे स्मितहास्य. पार विरघळुनच गेलो. थांबलो बोलायला. संपुर्ण वेळ त्याचा विषय. तो, त्याचा मुलगा , तो इथे असतो , तो हे करतो. मध्येच माझ्या लग्नाची पृच्छा. आणि लवकर छानशी मुलगी पाहुन लग्न करण्याबद्दल आग्रह. दीनवाण्या भावाने सगळे पचवत उभा होतो, तिथुन फुटायची संधी शोधत. आणि एकदम विषयाचा सुरच बदलला. तिचे सुनपुराण सुरु झाले आणि मी हतबल होऊन मान डोलावत त्याचा स्विकार करु लागलो.............


अरे हो मी सांगायलाच विसरलो सुरुवातीला, ती "त्या"ची आई होती.......................................

Thursday, June 5, 2008

पहिला पाऊस

आनंद उवाच...............................

पहिल्या पावसाची पहिली सर,
तुझीच आठवण घेऊन आली,
आसुसलेल्या माझ्या मनाला,
हळुवारपणे भिजवुन गेली,

ऊरात माझ्या भरुन गेली,
मंद सुवास ओली माती,
चित्त आले बहरुनी माझे
हात घेता तुझाच हाती,

स्पर्श तुझा होता मजला,
मनात वाही तुफान वारा,
कल्पनेच्याही पलिकडे नेई,
वाहुन मज प्रेमाच्या धारा,

कडाडुन येई मग वीज अशी ही,
लगबग मग तु बिलगुन जाशी,
एकरुप मग होऊन मजसवे,
साधिशी संवाद तु ह्रुदयाशी,

असेच वेडावुन माझे मन,
बेभान करुन टाक कायमचे,
व्यापुन दुनिया सारी माझी,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे.........................