Thursday, April 26, 2018

ज़िंदगी

आनंद उवाच.....

क्या क्या सपनें दिखाके, कहाँ लायी है ज़िंदगी
अपने आपमें सिमटके, ये कहाँ आयी है ज़िंदगी

 ख्वाबोकी दुनिया में, रह दिया होता हमें
जीने राहमें अकेले यूँ रास्तेपे लायी है ज़िंदगी

 हम तो बस चाँदनी देखना चाहते थे उम्रभर
पत्थरोंकी आगोश में सुला गयी है ज़िंदगी

तुझे , बस तुझे ही अपनाने की चाह में
तुमसेही कितनी दूर ले आयी है ज़िंदगी

Wednesday, March 29, 2017

स्प्रिंग ब्रेक केबिन ..... ..... ...."राज, कसलं मस्त घर आहे रे!!!" आशु ने गाडीतून उतरता उतरता मोठ्ठा श्वास घेत घराकडे नजर टाकली.

बऱ्याच दिवसांपासून ह्या स्प्रिंग ब्रेक ची वाट बघत होती ती. वर्षाभरापूर्वीच लग्न झाले होते. लग्न म्हणजे लिटरली चाट मंगनी पॅट ब्याह असाच प्रकार होता
MS  झालेला राज त्याच्या चुलत भावाच्या लग्नासाठी भारतात जेमतेम १५ दिवसासाठी काय येतो. त्या लग्नात मुलीकडून आलेल्या आशूला राजची आई काय पहाते, पुढच्या दिवशी राज आणि आशु चा भेटायचा कार्यक्रम काय ठरतो आणि  राज भारतात आल्याच्या १० व्या दिवशी लग्न होते

पुढच्या ५ दिवसात आशु चा व्हिसा , पेपरवर्क  मध्येच भुर्रकन उडून गेले . राज गेल्यावर साधारण महिन्याभराने आशु  सुद्धा राजकडे पोचली . पुढचे वर्षभर राजची नवी नोकरी , आशुचे अमेरिकेत अड्जस्ट होणे ह्यातच निघून गेलं. एकमेकांबरोबर राहून सुद्धा निवांत वेळच नव्हता मिळाला. आशूला इथे येऊन वर्ष झाले आणि अनायासे स्प्रिंग ब्रेक चे आउटिंग करायचे म्हणून राजनेच महिन्याभरापूर्वी ही केबिन गुपचूप  बुक करून ठेवली होती

नवीनच घर होते ते. स्वस्त होते आणि फारसे रिव्ह्यूज पण नव्हते.
"काय फरक पडतोय? नदीकाठी आहे आणि मस्त वेदर पण आहे. ample time for loads of romance" असा विचार करून फ्रायडे संध्याकाळी ऑफिस मधून घरी येऊन, आशुला कुठ्ल्याही तयारीशिवाय पीकप करून आणले होते. केबिन जवळ येईपर्यंत आशूला प्लॅन ची भनक सुद्धा लागू दिली नव्हती

"wow!!! दुमजली घर with २ बेडरूम्स  and attic!!! Ample space for ....... "
तेवढ्यात आशु च्या "राSSज ....... " हाकेने राजची रोमँटिक विचार शुंखला तुटली

आशु अमेझ्ड अवस्थेत  लिविंग मध्ये उभी होती. राज मागे गेला आणि हळूच आशुचे डोळे मिटले .

"अरे राज , हे बघ ना !!!"
"सोड ग !! मी काय हे बघायला आलोय का? आता पुढचे दोन दिवस , मी तुला आणि तू मलाच बघ !!!!!"


******


"घर तर छान आहे राहुल, पण एकही रिव्ह्यू नाही?"
"आता हे किती चिवडशील गौरी? अगं नवचं असेल ते. केदार ही किल्ली घे घराची. तू आणि भैरवी बॅग्स आत न्या पाहू. मी गाडी नीट लावून येतो "

केदार आणि भैरवी , राहुल आणि गौरीची मुलं, excited होऊन किल्ली घेऊन धावत घर उघडून आत घुसली
"अरे बॅगा तर न्या"
"तूच आण येताना !!!!"


घरात घुसल्या घुसल्या पहिले आपली बेडरूम कुठली हे ठरवायला वर जाऊन भटकून आले. तोवर राहुल गाडी पार्क करून बॅगा घेऊन आत आला
पडतो तर गौरी लिव्हींग मध्ये स्तंभित उभी !!!

"काय झाले?
"अरे राहुल!! लिविंग मध्ये कसलं डेकोरेशन केलय ह्या माणसाने!! किती प्रकारच्या बाहुल्या आहेत  बघ ना सगळीकडे !! आणि कसल्या जिवंत वाटताहेत?........ "

Tuesday, February 21, 2017

श्वासाचं लोन

"चला , आता सुटले  बाकीच्या व्यापातून, आता बसायचं का?"
"हो! आलोच जरा!!!
……….

"हं ! सांगा!
"आज किती मोठी यादी आहे?"
"बरीच आहे, पहिले तुमच्या लाडक्यांची घेऊ या !!!"
"हा! हा!! हा!!  माझे सगळेच लाडके आहेत. पण तू म्हणतोयस  तर हीच यादी घे "
"जागा : झांजीबार, टांझानिया. माता पिता : लवंग मजूर , ८ भावंड होती ३ आधीच आली परत ………"
"आज कुटुंबाच्या  माहितीला रजा दे. फक्त जागा सांग, लवकर आटोपुया, ह्याला बावन्न कोटी दे  !!!!"

"जागा : क्योटो  जपान"
"जपान? आफ्रिकेतून डायरेक्ट जपान? बरं , दे १०० कोटी "

"जागा : शांघाय, चीन "
"६२ कोटी "
.
.
.
.
.
.

"जागा: आSSमची मुंबई , भारत "
"५०"
"कोटी???"
"नाही रे फक्त ५०"

"देवी, जाम झोलर दिसतोय हा आयटम???"
"नाही रे!!! पुण्य करून मोठ्ठा हात मारलाय ह्याने. एका फटक्यात श्वासाचं लोन फेडलंय.
खात्यात फक्त ५० च शिल्लक आहेत,  नुसता हात लावून परत येणार . आणि मग कायमचा निवृत्त.
मोक्ष देण्याचा आदेश आलाय वरून !!!!!!"

Thursday, October 13, 2016

बायको , मी आणि "ती"

काल संध्याकाळ.................................

"आज ती  भेटली होती वाटतं?" बायकोच्या प्रश्नाने एकदम धस्स झालं. दुसरं काही नाही , पण ह्या बायकांचे नेटवर्क जब्बरदस्त असतं . कुठली खबर कुठे , कशी पोचेल आणि तीच माहिती आपल्यापर्यंत कशी येईल ह्याचा काही एक नेम नसतो.

"क.. क.. काय झालं?" पोटातल्या गोळ्याने माझा नकळत SRK झाला खरा.

"मी भरपूर काय काय खायला करते आहे कळले"

च्यायला!!!! मोजून ५ मिनिटांपूर्वीच तिला बाय केलं मी आणि गाडी पार्क करून घरात पाऊल टाकेपर्यंत स्टेटस अपडेट्स पोचले सुद्धा ? टू मच आहे हे ....

"मग करतेच आहेस ना तुझ्या टर्मरिक कुमकुम ची फुल टू तयारी ???"
" अरे हो, पण सगळ्यांना कुठे बोलावलंय ?" विषय सोडून फाटे फोडायची जुनी सवय !!!!
"म्हणजे तिला नाही बोलावलंय?"
"तिला बोलावलंय रे, पण तिच्या शेजारणीला नाही"
"काय म्हणाली ती ?"
"काही नाही, काय आहे आजचा मेनू ?? नवरा म्हणाला भरपूर काय काय करतेयस म्हणून !!!"
"ए प्लिज , मी काहीच बोललो नाहीये.  भेटली तेव्हा हाय म्हणालो , निघालो तेव्हा बाय म्हणालो , ह्यापलीकडे एक शब्द नाही काढलाय तोंडातून "
"माहिती आहे रे, ती तुला भेटली म्हणून छळतेय "
"आता ऑफिस वेगळे असले तरी सेम पार्किंग लॉट आहे तर भेटणारच ना !!!"
"जाऊंदे , तुझ्याशी गप्पा मारायला नाही वेळ मला , हा घे तुझा चहा आणि  मी चालले माझ्या टर्मरिक कुमकुम च्या तयारीला"

मी ही चहाचा  टमका घेऊन टी व्ही कडे वळलो ... .... ....


आज संध्याकाळ  ... .... .... ... .... .... ... .... .... ... .... ....
ऑफिस मधून पार्किंग मध्ये घुसलो . नेहमीच्या जागी "ती' उभी होतीच . गाडी अनलॉक करून ड्रायव्हींग सीटवर बसलो आणि दार बंद केले , दुसऱ्या दाराने "ती" पण बसली.
"हाय"
"हाय"

"काल भेटल्याचे का बोललीस?"
"अरे , काय करतेयस खायला म्हणून विचारले, तर तू भेटलास का असे विचारले तुझ्या बायकोने. मग पटकन नाही असे नाही म्हणता आले. म्हणून सांगून टाकले की तू खूप काही करतेयस असं  कळलं  म्हणून,  बस एव्हढंच"

"पण आपण तर काल ऍबसॉल्युटली काहीच बोललो नव्हतो, वेळ कुठे होता?"
"मग काय केलं आपण?"
"मु..... ...... "

"बास !! पुरे !!! मग आज नुसत्या गप्पाच? का कालचं अर्धवट राहिलेलं पूर्ण करायचंय? " विथ खट्याळ हसू..... .

मी शांतपणे माझे दार उघडून खाली उतरलो आणि मागचे दार उघडून मधल्या सीटवर जाऊन बसलो.

फ्रंटसीट्स  पेक्षा मधली सीट जास्त कम्फर्टेबल असते नाही का?

Friday, September 16, 2016

किक ऑफ मीटिंग

"सगळे आलेयत?"
"हो"
 "चला , सुरु करूया!!अजेंड्यानुसार,  चेक लिस्ट आहे का समोर? "

"हो"

"गोल्स काय आहेत?"
"सगळंच अपग्रेड करायचंय."
"सगळं म्हणजे? आपण पण?"
"नाही , आपल्याला सनसेट व्हायला वेळ आहे अजून, तिसऱ्या चौथ्या अपग्रेड नंतर व्हावे लागेल बहुदा "

"हं !! कुणा कुणाचे रोल्स काय काय असणार आहेत?"

सगळ्यांनी आपापले रोल्स , टास्क्स आणि जबाबदाऱ्या सांगितल्या.

"स्कोप  आणि डेट्स ठरल्या आहेत  का?"
"हो, हा सगळा हाय लेव्हल प्रोजेक्ट प्लॅन आहे. मी सगळ्यांशी  शेअर केलाय. सगळ्या फेजेस आणि माईल स्टोन्स कव्हर केल्यायेत त्यात"

"गुड! एनी  हिकप्स?? रिस्क काय काय आहेत? त्यांचं मिटिगेशन?  रोलओव्हर्स?"

"शो स्टॉपर काही नाही. दोनच आहेत. एक फुटकळच आहे, दुसरी जरा क्रिटिकल आणि टाइमबाउंड आहे."

"काय काय आहेत?"

"पहिली म्हणजे या वेळेचा मनू  आयडेंटिफाय  नाही झालाय. तो होऊन जाईल.  पण तुमचा कल्की अवतार कधी होणार ह्यासाठी तुमची वेळ आणि प्लॅन  ठरलेला  नाहीये अजून, तोच तर ह्या वेळेला प्रलयाची सुरुवात करणार आहे ना???"

Wednesday, August 31, 2016

सरींवर सरी

आनंद उवाच.......

सरींवर सरींचे पुन्हा
दिवस परत आले आहेत
सयेच्या धारेत भिजायचे
दिवस परत आले आहेत

सरल्या क्षणांची अडगळ
उगाच आता भिजेल पुन्हा
नकोशी घरं बुजवायचे
दिवस परत आले आहेत

सारे सोडता येत नाही
सारे खोडता येत नाही
साऱ्या खुणा मात्र बदलायचे
दिवस परत आले आहेत

का बांधू अन कशास सांधू
पागोळ्याचे फुटलेले पेव
साठलेली मरगळ निचरायचे
दिवस परत आले आहेत

Friday, November 7, 2014

तुही अन मीही

आनंदउवाच…………………………...


एकमेकांत गुंतुन जाऊ तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही
का आससावे चार घटिकांसाठी त्या ?
का उगा धरावा अनंताचा ठाव त्या ?
आहे तो क्षण साधू तुही अन मीही....

किती अन कशास हव्या इतरांच्या कथा?
तू, मीच आहोत ह्या क्षणाची गाथा,
व्यथांचा बाजार टाकू , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

"अंतर" सोडून बाह्यात अलगद फसतो,
"अंतरा"त का किल्मिषभारास पोसतो?
"अंतरा" तले अंतर सोडु , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

पुरेसे आहोत, मला तू अन तुला मी,
कशास आहे , आपल्यात हा "मी" ?
कधीतरी "मी" पण विसरू , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

भविष्यधन साठवायचेही आहेच
उद्यास्तव आज मरायचेही आहेच,
ह्याच निमिषात रमु, तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही
        त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही ………

तो चंद्र

कोजागिरी पौर्णिमा, तिथीने आईचा वाढदिवस..........................

आनंद उवाच................
येतील जातील कैक पौर्णिमा
तो चंद्र आता हरवुन गेला,
चकोरास या निराधार सोडुन,
तो चंद्र कसा फसवुन गेला,

हाती सहजी गवसत नाही,
उंच उंच जाणारी ती म्हातारी,
जगणे हसणे खेळत शिकवत,
तो चंद्र बघा रडवुन गेला,

व्यवहाराच्या असंख्य चिंध्या,
स्वप्नांची झालर गुंफुन त्यात,
जगण्याची गोधडी उबदार अशी,
तो चंद्र हळुच उसवुन गेला

कधीतरी येशी माझ्या वाटे,
वाटुन अंतर तुडवत गेलो,
अनंताचे अंतर ठेऊन अंतरी,
तो चंद्र अलगद निसटुन गेला.
तो चंद्र अलगद निसटुन गेला.....

Tuesday, February 25, 2014

कुठेही कसेही..............

आनंद उवाच................

कुठेही कसेही,
असेल तिथे रुजायचे,
जगण्याच्या धारेत,
मनसोक्त भिजायचे

कुठेही कसेही,
स्वप्ने सत्याशी जोडायची
आभाळापारची क्षितीजं
पाठीमागे सोडायची

कुठेही कसेही
अंधारास का भ्यावे?
"अंतरा"तल्या "त्या"ला
भिनवुन सर्वस्वी घ्यावे

कुठेही कशीही,
मौज नक्की करायची,
गुंत्यांची गंमत सुद्धा
गुंता होऊन पहायची

कुठेही कसेही,
नाहे उगा रडायचे,
वृथा काळाला घाबरुन,
जगणे का सोडायचे?

Tuesday, August 27, 2013

दिवस सरुन जातसे

आनंद उवाच.....................दिवस सरुन जातसे,
संध्या येणे आहे अजुन
जगणे भरुन जातसे,
जगुन होणे आहे अजुन

गुंतागुंत ही आयुष्याची
वाटे अवघड जगण्यासाठी,
एक टोक मी धरुन आहे.
दुसरे मिळणे आहे अजुन

जगण्याच्या ताळेबंदात
काही आणे कमीच असती,
विवंचनांचे देणे खर्चुन,
हर्ष जमणे आहे अजुन

अनादी अनंताचा झगडा,
मांडला आहे सटवाईशी,
दोन डावच हरलोय,
खेळ जिंकणे आहे अजुन,
खेळ जिंकणे आहे अजुन..................................................