Tuesday, November 23, 2010

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय

आनंद उवाच.....................

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझं येणं एक सुंदर पहाटस्वप्न होतं,
आसमंतात तुझं असणंच माझं सर्वस्व होतं,
ते स्वप्नंच आता हळुहळु फाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यासाठी कुठलेही शिवधनुष्य तोडले असते,
तुझ्याचसाठी ते तुटलेले धागेही जोडले असते,
पण नियतीच्या मनात काही वेगळंच घाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यामध्ये माझा "मी" चा निचरा झाला होता,
आपल्या विश्वात तुझ्या स्वजनांचा मात्र कचरा आला होता,
व्यवहारी किल्मिष हळुहळु मनात दुकान थाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

दोनाचे चार कुठे गेले आता शुन्यच येते फक्त बाकी,
पडले ते सुखांचे महाल, उरल्या मोडक्या खिंडारांची झांकी,
सारं गणितच चुकलंय हेच राहुन राहुन पटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

एव्हढा पावसात भिजुनसुद्धा मन पुर्ण सुकलंय,
जुनाट वठलेल्या पिंपळासम धरेपार झुकलंय,
वैषम्याचं विष मात्र हळुहळु साठतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय..................................................