Friday, November 7, 2014

तुही अन मीही

आनंदउवाच…………………………...


एकमेकांत गुंतुन जाऊ तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही
का आससावे चार घटिकांसाठी त्या ?
का उगा धरावा अनंताचा ठाव त्या ?
आहे तो क्षण साधू तुही अन मीही....

किती अन कशास हव्या इतरांच्या कथा?
तू, मीच आहोत ह्या क्षणाची गाथा,
व्यथांचा बाजार टाकू , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

"अंतर" सोडून बाह्यात अलगद फसतो,
"अंतरा"त का किल्मिषभारास पोसतो?
"अंतरा" तले अंतर सोडु , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

पुरेसे आहोत, मला तू अन तुला मी,
कशास आहे , आपल्यात हा "मी" ?
कधीतरी "मी" पण विसरू , तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही....

भविष्यधन साठवायचेही आहेच
उद्यास्तव आज मरायचेही आहेच,
ह्याच निमिषात रमु, तुही अन मीही
त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही
        त्यागून सारे , थोडे जगू तुही अन मीही ………

तो चंद्र

कोजागिरी पौर्णिमा, तिथीने आईचा वाढदिवस..........................

आनंद उवाच................
येतील जातील कैक पौर्णिमा
तो चंद्र आता हरवुन गेला,
चकोरास या निराधार सोडुन,
तो चंद्र कसा फसवुन गेला,

हाती सहजी गवसत नाही,
उंच उंच जाणारी ती म्हातारी,
जगणे हसणे खेळत शिकवत,
तो चंद्र बघा रडवुन गेला,

व्यवहाराच्या असंख्य चिंध्या,
स्वप्नांची झालर गुंफुन त्यात,
जगण्याची गोधडी उबदार अशी,
तो चंद्र हळुच उसवुन गेला

कधीतरी येशी माझ्या वाटे,
वाटुन अंतर तुडवत गेलो,
अनंताचे अंतर ठेऊन अंतरी,
तो चंद्र अलगद निसटुन गेला.
तो चंद्र अलगद निसटुन गेला.....