Wednesday, June 8, 2011

एकटाच उरलो मी

आनंद उवाच.................

आभाळ फाटलेले, विटलेले
टाका भरण्यास फिरलो मी
वाहुन पुसुन गेल्या रेघा,
वाळुत एकटाच उरलो मी

शोधताना धागा सुखाचा
गुंतती शत धागे क्लेशाचे
आयुष्याचे वस्त्र विणताना
कसा नकळे विरलो मी

आसावल्या मनास माझ्या,
माझाच कसा तो राग येई
समजुतींचे गोफ बांधताना,
मध्यान्हीतच पुरा सरलो मी

जगणे हे बंदीशालेसम ,
सारेच रस्ते चुकलेले,
चक्रव्युही जगण्याच्या या
बेभान होऊन शिरलो मी

अपेक्षांचे डोईजड ओझे
अन आठवांचा अनंत लोंढा
गिळुन गेले संपवुन सगळे ,
जाणिव नेणिव विस्मरलो मी

पीडा सांगु कशी कुणाला ,
सारेच गांजले "स्व"त्वात
पचवुन हलाहल मिथ्याचे
होण्यास निळकंठ झुरलो मी

नेमेची उगवे चंद्र हा अर्धाच,
विसरुन चांदणे दुरवर कोठे
ध्रुवशोधाच्या आंधळ्या प्रवासात,
अडखडत धडपडत पुरलो मी...................................................

No comments: