Wednesday, May 16, 2012

जगणे का सोडावे?


आनंद उवाच................................

गुरफटुन आहे तुझ्यात अजुनही,
मन माझे कसे मोडावे?
हरवलीस जगण्यातुन तु जरी,
तरी जगणे का सोडावे?

येणे तुझे, अपघात गोड होता,
जाणे असे नियतीचा खेळ,
दोन घडींचे हरणे जिंकणे,
त्यास जगणे का सोडावे?

निराशेचा कृष्ण गर्ता,
गवसतोच तळ कधीतरी हाताला,
अथांग अढळ आशेचा तो पसारा,
मग जगणे का सोडावे?

निरपेक्ष काळ,
नसतो व्यवहारास काहीच थारा,
साथ इथे अपेक्षांची तुझ्या,
मग जगणे का सोडावे?

तिकडे न तुझा साथ सहारा,
म्हटले जरी जगणे सोडावे,
उतुन सांडे आठवणींचा सागर,
उगा जगणे का सोडावे?

Tuesday, May 15, 2012

तु, तुझा स्पर्श


आनंद उवाच............

तु, तुझा स्पर्श, कल्लोळ दाटे,
एकेक कण तुझा मनात साठे

तु, तुझा स्पर्श, बेहोष काया
अधिर ते मन, अमृत लुटाया

तु, तुझा स्पर्श, बेबंद तारु,
आवरु कसा हा मनाचा वारु?

तु, तुझा स्पर्श, शंका विरती
बेभान लाटा, उधाण भरती

तु, तुझा स्पर्श, जगास भुलावे
सोडुन सारे, तुझ्यातच भिनावे


Thursday, May 10, 2012

कसा भुलून गेलो


आनंद उवाच..............

सांगू कसे तुजला कसा भुलून गेलो
तव स्पर्श होता सहज फुलून गेलो

साद तुझी येता, बहरे वसंत मनी
धुंद होता चित्त, नकळे खुलून गेलो

उतून उल्हास , आभाळ ठेंगणे झाले,
रोमांचित मी, झुल्याविणा झुलून गेलो.

सलगून आहे अजूनी


आनंद उवाच..................

सहवास मनात, सलगून आहे अजूनी
स्पर्श अधराचा, बिलगून आहे अजूनी

श्वासात तुच अवघी, ध्यासात तुच अवघी
सारेच तुजसाठी, त्यागुन आहे अजुनी

रात्र सरली, मोह सरसरता सरेना
चैत्रगंध चित्तात, सुलगुन आहे अजूनी

तव प्रीतीचे हे बंध, चिरंतर धरुन आहे
तुजविण व्यर्थ जगणे, उमगून आहे अजुनी

क्षणोंक्षण


आनंद उवाच.............................


तुझ्यासवेचे ते क्षण
तुझ्यावाचुन ते क्षण
जगण्याची दोन्ही टोके
अधांतरी मी क्षणोंक्षण


तव विरहाचे ते क्षण,
तव मीलनाचे ते क्षण
वाट दुर हरवली ती
कसे वेचु मी क्षणोंक्षण


तुज आठवांचे ते क्षण
सजल नयनांचे ते क्षण
आठवणींचा पाउस हळवा
चिंब भिजलो मी क्षणोंक्षण


तुझ्या ओढीचे ते क्षण
तुज समर्पित ते क्षण
विरून गेले आयुष्य सारे
आता तुझाच मी क्षणोंक्षण

Tuesday, April 10, 2012

तू कधीच मज विसरून गेलीस


आनंद उवाच.........

उधळून  तेव्हा  मजवर
स्वप्नमोती पसरून गेलीस
तो ठेवा मी जपला तसाच
तू कधीच मज विसरून गेलीस

अर्पुन तुजला आशा इच्छा
गुंफत होतो स्वप्न मलमली
सज्जात तिष्ठत अजुनही तसाच
तू कधीच मज विसरून गेलीस

अल्याड पल्याड जवळ दुर
धागा मनीचा अतूट होता
हृद्बंध धरुनी मी आहे तसाच
तू कधीच मज विसरून गेलीस

देऊ 'न ' अंतरास अंतर
अंतरीचा वादा तुझाच होता
शब्दबद्ध मी अडकलो तसाच
तू कधीच मज विसरून गेलीस

Monday, March 19, 2012

ती बातच वेगळी


आनंद उवाच............

रसाळ ते जगणे, जिंदगी ही आगळी
पण गतआयुष्याच्या चित्रपटाची ती बातच वेगळी

व्यवहारातुन येती हर्षाची उडत पाखरे
पण अल्लड बागडण्याची ती बातच वेगळी

विवंचनांचे गाडे भरुनी येती असंख्य राती
पण त्या परीक्षाजागरांची ती बातच वेगळी

स्वप्नांचे इमले काही गमले बरेचसे भंगले
पण त्या पहिल्या होकाराची ती बातच वेगळी

आता आयुष्य हे कसेही जगु वा कंठु
पण जिवलगात गुंतुन जाणे , ती बातच वेगळी

Tuesday, November 15, 2011

सावली


आनंद उवाच................................

मदत हवी आहे मला , मदत देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

कशी , कुठे हरवली, कधी कळलेच नाही
का कुठे विसरुन आलो, गमलेच नाही
काय गमवले आहे हे समजुन घेता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

साधी भोळी बिचारी तरीही होती थोडी वेगळी
अहोरात्र , जिवश्चकंठश्च जोडीदार असे ती आगळी
दुर्लभच अशी साथ मिळणे, कळुन घेता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

काय प्रमाद घडला माझा, रुसुनी असे लपुन जावे?
का ते चिडावे मजवरी, मज हताश सोडुन जावे?
कसे करावे पातकमार्जन उपदेश देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?


नकोसे झाले आहे मजला तिच्याविना व्यर्थसे जगणे
पार गर्तेत जावे आयुष्य जसे शुन्य शुन्यास भागणे
हरवले आहे माझे प्राण, गवसुन देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

Friday, October 14, 2011

सोनपरीचा बाप


आनंद उवाच..................

चुकुन प्रेमात पडुन असाच
असा कसा भिजुन गेलो?
अडकुन या लग्नाच्या बेडीत
नकळत कसा विझुन गेलो!!!!!

पुर्वी जगणे हा छंद होता,
स्वप्नांना कसला धरबंध नव्हता,
स्वप्न कसले, कसले सत्य आता
जगण्याच्या क्लेशात थिजुन गेलो

नाही स्वार्थ परमार्थांची सांगड
कटकट नाही, नाही भानगड
अनंत गुंते, गहाळ उलगड,
संसारास्तव वैराग्याला त्यजुन गेलो

परतीचा मार्ग हरवुन गेला
नक्षत्राचे देणे मात्र देउन गेला
नवे सोनेरी विश्व ठेउन गेला,
सोनपरीचा बाप म्हणुनी सजुन गेलो

Friday, September 30, 2011

सखी

आनंद उवाच........................

सखीला सांगतो मी मनातल्या गोष्टी ,
काही उघड , काही लपलेल्या,
हिशोब देतो त्या मोहाच्या क्षणांचा ,
काही धरलेल्या , काही सोडलेल्या,

सखीशी उघडतो, स्वप्ने मनातली,
काही अस्फुट, काही भंगलेली,
काही भावनेत भिजुन विझलेली,
काही आशेत मनसोक्त रंगलेली,

सखीशी आहे एक अतुट बंधन,
अनवट नाजुक क्षणांनी सांधलेले,
अभंग अनादी अनंतश्या,
सुख दु:खाच्या दोऱ्याने बांधलेले,

दिशाहीन भरकटलेल्या तारुस माझ्या ,
असतो फक्त सखीचाच किनारा,
असहाय्यश्या , हताशलेला मनाला,
सखीच असते मनाचा ध्रुव तारा..........................