Monday, February 18, 2013

दुजे काय काम आता?


आनंद उवाच................

हरेक क्षण झिजणे , दुजे काय काम आता?
तुझीच वाट पहाणे , दुजे काय काम आता?

मी इथे पण तु तिथे, पलिकडे या शब्दांच्या
अक्षरांची जोडतोड, दुजे काय काम आता?

साता सागरा पल्याड, अंतर अडकलेले
साहुया लाटांचा दंगा, दुजे काय काम आता?

वसंत आला दाराशी, बहार तरी उदास,
शोधावे मेघदुतास, दुजे काय काम आता?

जगण्याच्या चिंध्याचचिंध्या, तुझ्यावाचुन आता
वेचतोय क्षण कण, दुजे काय काम आता?

विरहाचे पांघरुण अन एकांताची उशी,
विसावावे तुझ्या स्वप्नी, दुजे काय काम आता?

Wednesday, February 13, 2013

तुझे नसणे तुझे असणे


आनंद उवाच........................

तुझे नसणे, जगणे अडगळ
वसंतातही मनाची पानगळ

तुझे असणे, जगणे होते खास
दान चंद्राचे ते लाभे चकोरास

तुझे नसणे, ग्रहण मज भासे
विरहाचा राहु मम सुखा ग्रासे

तुझे असणे, जगण्या भरे रंग
इंद्रधनुवरी मन होई दंग

तुझे नसणे, रिते रितेसे मन
हरपले भान, हरवले क्षण

तुझे असणे, पुर्णार्थ ते जगणे
पुन्हा नको आता तुझे ते नसणे.............