Tuesday, August 27, 2013

दिवस सरुन जातसे

आनंद उवाच.....................



दिवस सरुन जातसे,
संध्या येणे आहे अजुन
जगणे भरुन जातसे,
जगुन होणे आहे अजुन

गुंतागुंत ही आयुष्याची
वाटे अवघड जगण्यासाठी,
एक टोक मी धरुन आहे.
दुसरे मिळणे आहे अजुन

जगण्याच्या ताळेबंदात
काही आणे कमीच असती,
विवंचनांचे देणे खर्चुन,
हर्ष जमणे आहे अजुन

अनादी अनंताचा झगडा,
मांडला आहे सटवाईशी,
दोन डावच हरलोय,
खेळ जिंकणे आहे अजुन,
खेळ जिंकणे आहे अजुन..................................................

Saturday, August 10, 2013

मी माणुस आहे





लालडब्यातुन उतरलो तर मिट्ट काळोख . एकतर उशिरा पोचलो, जायला सोपं म्हणुन हायवेलाच उतरलो. अमोश्या, त्यातुन काळोखा रस्ता म्हणजे फाल्गुन मासच.  ५ मिनिटांवर रेल्वेक्रॉसिंग, पुढे ५ मिनिटांवर मुक्काम असा हिशोब मांडत चाचपडत चालु लागलो.
.
"खडी? फाटक कुठंय?"
हुश्श, मिळाले फाटक.
"थंड?"  सर्रकन काटाच आला
फाटकाचे टोक शोधत सरकु लागलो.
.
.
.
"धातु ऐवजी शरीर?"
थंडीतसुद्धा घामाचा धबधबा, ठोक्यांचा घणघणाट अचानक वाढला.
अनपेक्षितरित्त्या ओरडलो " कोण आहे?"
तत्पर प्रतिप्रश्न "तु कोण आहेस?"
.
सेकंदाची जीवघेणी स्मशानशांतता.
अवसान एकवटुन म्हणालो, "मी माणुस आहे"
.
.
.
.
.
.
.
आश्वस्त प्रत्युत्तर "मीपण माणुसच आहे मित्रा, माणुसच आहे"

एकटेपण

आनंद उवाच..............


कुणीतरी असाच येतो,
ओसरी बळकावुन जातो

एकटेपण मग संपुन जाते
शहाणपणही सोडुन जाते

ओसरीवाला मालक होतो
संसाराचा गाडा हाती येतो

गाडा ओढता जाणिव होते
एकटेपणच ते बरे होते




शब्द मिळती घाऊक येथे

आनंद उवाच.........

शब्द मिळती घाऊक येथे,
अर्थाची पर्वा कुणास आहे?
पढतमूर्ख सारेच आपण,
"बुद्धा"ची पर्वा कुणास आहे?

चिकीत्सा करणे, टीका करणे,
हाच धर्म उरला आता,
"ज्ञाना"चा कंठ पिचुन गेला,
भावार्थाची पर्वा कुणास आहे?

कुणी वंदा तर कुणी निंदा,
"त्या"चा धर्मसंस्थापनाचा धंदा,
हळुच येई तो अवतार घेऊन,
आवतणाची पर्वा कुणास आहे?

खेळ जिंकणे आहे अजुन

आनंद उवाच.....................

दिवस सरुन जातसे,
संध्या येणे आहे अजुन
जगणे भरुन जातसे,
जगुन होणे आहे अजुन

गुंतागुंत ही आयुष्याची
वाटे अवघड जगण्यासाठी,
एक टोक मी धरुन आहे.
दुसरे मिळणे आहे अजुन

जगण्याच्या ताळेबंदात
काही आणे कमीच असती,
विवंचनांचे देणे खर्चुन,
हर्ष जमणे आहे अजुन

अनादी अनंताचा झगडा,
मांडला आहे सटवाईशी,
दोन डावच हरलोय,
खेळ जिंकणे आहे अजुन,
खेळ जिंकणे आहे अजुन..................................................

Monday, February 18, 2013

दुजे काय काम आता?


आनंद उवाच................

हरेक क्षण झिजणे , दुजे काय काम आता?
तुझीच वाट पहाणे , दुजे काय काम आता?

मी इथे पण तु तिथे, पलिकडे या शब्दांच्या
अक्षरांची जोडतोड, दुजे काय काम आता?

साता सागरा पल्याड, अंतर अडकलेले
साहुया लाटांचा दंगा, दुजे काय काम आता?

वसंत आला दाराशी, बहार तरी उदास,
शोधावे मेघदुतास, दुजे काय काम आता?

जगण्याच्या चिंध्याचचिंध्या, तुझ्यावाचुन आता
वेचतोय क्षण कण, दुजे काय काम आता?

विरहाचे पांघरुण अन एकांताची उशी,
विसावावे तुझ्या स्वप्नी, दुजे काय काम आता?

Wednesday, February 13, 2013

तुझे नसणे तुझे असणे


आनंद उवाच........................

तुझे नसणे, जगणे अडगळ
वसंतातही मनाची पानगळ

तुझे असणे, जगणे होते खास
दान चंद्राचे ते लाभे चकोरास

तुझे नसणे, ग्रहण मज भासे
विरहाचा राहु मम सुखा ग्रासे

तुझे असणे, जगण्या भरे रंग
इंद्रधनुवरी मन होई दंग

तुझे नसणे, रिते रितेसे मन
हरपले भान, हरवले क्षण

तुझे असणे, पुर्णार्थ ते जगणे
पुन्हा नको आता तुझे ते नसणे.............

Tuesday, January 8, 2013

पुन्हा


आनंद उवाच.................


कैक युगांनी मोहरलो मी पुन्हा,
साथीने तुझ्या बहरलो मी पुन्हा,

नको तो रुसवा, नको तो दुरावा
अबोलीसंगे विखरलो मी पुन्हा,

सोडुनिया तुझ्या कथा, माझ्या व्यथा,
आठवांत तुझ्या मुरलो मी पुन्हा,

तुज मिळवाया, संग जुळवाया
जन्मभर असा झुरलो मी पुन्हा,

जन्म जाउदे पाहण्या वाट तुझी,
स्वप्नांत सारे विसरलो मी पुन्हा.................................