Thursday, October 13, 2016

बायको , मी आणि "ती"

काल संध्याकाळ.................................

"आज ती  भेटली होती वाटतं?" बायकोच्या प्रश्नाने एकदम धस्स झालं. दुसरं काही नाही , पण ह्या बायकांचे नेटवर्क जब्बरदस्त असतं . कुठली खबर कुठे , कशी पोचेल आणि तीच माहिती आपल्यापर्यंत कशी येईल ह्याचा काही एक नेम नसतो.

"क.. क.. काय झालं?" पोटातल्या गोळ्याने माझा नकळत SRK झाला खरा.

"मी भरपूर काय काय खायला करते आहे कळले"

च्यायला!!!! मोजून ५ मिनिटांपूर्वीच तिला बाय केलं मी आणि गाडी पार्क करून घरात पाऊल टाकेपर्यंत स्टेटस अपडेट्स पोचले सुद्धा ? टू मच आहे हे ....

"मग करतेच आहेस ना तुझ्या टर्मरिक कुमकुम ची फुल टू तयारी ???"
" अरे हो, पण सगळ्यांना कुठे बोलावलंय ?" विषय सोडून फाटे फोडायची जुनी सवय !!!!
"म्हणजे तिला नाही बोलावलंय?"
"तिला बोलावलंय रे, पण तिच्या शेजारणीला नाही"
"काय म्हणाली ती ?"
"काही नाही, काय आहे आजचा मेनू ?? नवरा म्हणाला भरपूर काय काय करतेयस म्हणून !!!"
"ए प्लिज , मी काहीच बोललो नाहीये.  भेटली तेव्हा हाय म्हणालो , निघालो तेव्हा बाय म्हणालो , ह्यापलीकडे एक शब्द नाही काढलाय तोंडातून "
"माहिती आहे रे, ती तुला भेटली म्हणून छळतेय "
"आता ऑफिस वेगळे असले तरी सेम पार्किंग लॉट आहे तर भेटणारच ना !!!"
"जाऊंदे , तुझ्याशी गप्पा मारायला नाही वेळ मला , हा घे तुझा चहा आणि  मी चालले माझ्या टर्मरिक कुमकुम च्या तयारीला"

मी ही चहाचा  टमका घेऊन टी व्ही कडे वळलो ... .... ....


आज संध्याकाळ  ... .... .... ... .... .... ... .... .... ... .... ....
ऑफिस मधून पार्किंग मध्ये घुसलो . नेहमीच्या जागी "ती' उभी होतीच . गाडी अनलॉक करून ड्रायव्हींग सीटवर बसलो आणि दार बंद केले , दुसऱ्या दाराने "ती" पण बसली.
"हाय"
"हाय"

"काल भेटल्याचे का बोललीस?"
"अरे , काय करतेयस खायला म्हणून विचारले, तर तू भेटलास का असे विचारले तुझ्या बायकोने. मग पटकन नाही असे नाही म्हणता आले. म्हणून सांगून टाकले की तू खूप काही करतेयस असं  कळलं  म्हणून,  बस एव्हढंच"

"पण आपण तर काल ऍबसॉल्युटली काहीच बोललो नव्हतो, वेळ कुठे होता?"
"मग काय केलं आपण?"
"मु..... ...... "

"बास !! पुरे !!! मग आज नुसत्या गप्पाच? का कालचं अर्धवट राहिलेलं पूर्ण करायचंय? " विथ खट्याळ हसू..... .

मी शांतपणे माझे दार उघडून खाली उतरलो आणि मागचे दार उघडून मधल्या सीटवर जाऊन बसलो.

फ्रंटसीट्स  पेक्षा मधली सीट जास्त कम्फर्टेबल असते नाही का?

Friday, September 16, 2016

किक ऑफ मीटिंग

"सगळे आलेयत?"
"हो"
 "चला , सुरु करूया!!अजेंड्यानुसार,  चेक लिस्ट आहे का समोर? "

"हो"

"गोल्स काय आहेत?"
"सगळंच अपग्रेड करायचंय."
"सगळं म्हणजे? आपण पण?"
"नाही , आपल्याला सनसेट व्हायला वेळ आहे अजून, तिसऱ्या चौथ्या अपग्रेड नंतर व्हावे लागेल बहुदा "

"हं !! कुणा कुणाचे रोल्स काय काय असणार आहेत?"

सगळ्यांनी आपापले रोल्स , टास्क्स आणि जबाबदाऱ्या सांगितल्या.

"स्कोप  आणि डेट्स ठरल्या आहेत  का?"
"हो, हा सगळा हाय लेव्हल प्रोजेक्ट प्लॅन आहे. मी सगळ्यांशी  शेअर केलाय. सगळ्या फेजेस आणि माईल स्टोन्स कव्हर केल्यायेत त्यात"

"गुड! एनी  हिकप्स?? रिस्क काय काय आहेत? त्यांचं मिटिगेशन?  रोलओव्हर्स?"

"शो स्टॉपर काही नाही. दोनच आहेत. एक फुटकळच आहे, दुसरी जरा क्रिटिकल आणि टाइमबाउंड आहे."

"काय काय आहेत?"

"पहिली म्हणजे या वेळेचा मनू  आयडेंटिफाय  नाही झालाय. तो होऊन जाईल.  पण तुमचा कल्की अवतार कधी होणार ह्यासाठी तुमची वेळ आणि प्लॅन  ठरलेला  नाहीये अजून, तोच तर ह्या वेळेला प्रलयाची सुरुवात करणार आहे ना???"

Wednesday, August 31, 2016

सरींवर सरी

आनंद उवाच.......

सरींवर सरींचे पुन्हा
दिवस परत आले आहेत
सयेच्या धारेत भिजायचे
दिवस परत आले आहेत

सरल्या क्षणांची अडगळ
उगाच आता भिजेल पुन्हा
नकोशी घरं बुजवायचे
दिवस परत आले आहेत

सारे सोडता येत नाही
सारे खोडता येत नाही
साऱ्या खुणा मात्र बदलायचे
दिवस परत आले आहेत

का बांधू अन कशास सांधू
पागोळ्याचे फुटलेले पेव
साठलेली मरगळ निचरायचे
दिवस परत आले आहेत