Thursday, May 17, 2012

मनातलं मळभ


आनंद उवाच.....................

आतातरी पाऊस थांबेल असं वाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझं येणं एक सुंदर पहाटस्वप्न होतं,
सर्वत्र तुझं असणंच माझं सर्वस्व होतं,
सारं स्वप्नंच आता हळुहळु फाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुजसाठी शिवधनुष्य तोडले असते,
ते तुटलेले धागेही सहज जोडले असते,
नियतीच्या पोटात मात्र वेगळंच काही घाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यात "मी" चा माझ्या पुरता निचरा झाला होता,
विश्वात आपल्या मात्र स्वजनांचा कचरा आला होता,
व्यवहाराचं किल्मिष मनात दुकान थाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

दोनाचे चार कुठे गेले, शुन्यच येते आता बाकी,
ढासळले महाल सुखांचे, उरल्या खिंडारांची झांकी,
गणितंच सारी चुकलीयेत, राहुन राहुन पटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

एव्हढा पावसात भिजुनसुद्धा मन पुर्ण सुकलंय,
जुनाट वठलेल्या पिंपळासम धरेपार झुकलंय,
वैषम्याचं हलाहल हळुहळु पसरत साठतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय..................................................

Wednesday, May 16, 2012

जगणे का सोडावे?


आनंद उवाच................................

गुरफटुन आहे तुझ्यात अजुनही,
मन माझे कसे मोडावे?
हरवलीस जगण्यातुन तु जरी,
तरी जगणे का सोडावे?

येणे तुझे, अपघात गोड होता,
जाणे असे नियतीचा खेळ,
दोन घडींचे हरणे जिंकणे,
त्यास जगणे का सोडावे?

निराशेचा कृष्ण गर्ता,
गवसतोच तळ कधीतरी हाताला,
अथांग अढळ आशेचा तो पसारा,
मग जगणे का सोडावे?

निरपेक्ष काळ,
नसतो व्यवहारास काहीच थारा,
साथ इथे अपेक्षांची तुझ्या,
मग जगणे का सोडावे?

तिकडे न तुझा साथ सहारा,
म्हटले जरी जगणे सोडावे,
उतुन सांडे आठवणींचा सागर,
उगा जगणे का सोडावे?

Tuesday, May 15, 2012

तु, तुझा स्पर्श


आनंद उवाच............

तु, तुझा स्पर्श, कल्लोळ दाटे,
एकेक कण तुझा मनात साठे

तु, तुझा स्पर्श, बेहोष काया
अधिर ते मन, अमृत लुटाया

तु, तुझा स्पर्श, बेबंद तारु,
आवरु कसा हा मनाचा वारु?

तु, तुझा स्पर्श, शंका विरती
बेभान लाटा, उधाण भरती

तु, तुझा स्पर्श, जगास भुलावे
सोडुन सारे, तुझ्यातच भिनावे


Thursday, May 10, 2012

कसा भुलून गेलो


आनंद उवाच..............

सांगू कसे तुजला कसा भुलून गेलो
तव स्पर्श होता सहज फुलून गेलो

साद तुझी येता, बहरे वसंत मनी
धुंद होता चित्त, नकळे खुलून गेलो

उतून उल्हास , आभाळ ठेंगणे झाले,
रोमांचित मी, झुल्याविणा झुलून गेलो.

सलगून आहे अजूनी


आनंद उवाच..................

सहवास मनात, सलगून आहे अजूनी
स्पर्श अधराचा, बिलगून आहे अजूनी

श्वासात तुच अवघी, ध्यासात तुच अवघी
सारेच तुजसाठी, त्यागुन आहे अजुनी

रात्र सरली, मोह सरसरता सरेना
चैत्रगंध चित्तात, सुलगुन आहे अजूनी

तव प्रीतीचे हे बंध, चिरंतर धरुन आहे
तुजविण व्यर्थ जगणे, उमगून आहे अजुनी

क्षणोंक्षण


आनंद उवाच.............................


तुझ्यासवेचे ते क्षण
तुझ्यावाचुन ते क्षण
जगण्याची दोन्ही टोके
अधांतरी मी क्षणोंक्षण


तव विरहाचे ते क्षण,
तव मीलनाचे ते क्षण
वाट दुर हरवली ती
कसे वेचु मी क्षणोंक्षण


तुज आठवांचे ते क्षण
सजल नयनांचे ते क्षण
आठवणींचा पाउस हळवा
चिंब भिजलो मी क्षणोंक्षण


तुझ्या ओढीचे ते क्षण
तुज समर्पित ते क्षण
विरून गेले आयुष्य सारे
आता तुझाच मी क्षणोंक्षण