Saturday, June 11, 2011

चांदणे पांघरलेले आकाश

आनंद उवाच...............

चांदणे पांघरलेले आकाश
मागुन कधीच मिळत नसते,
दुसऱ्याला आशाकिरण देणारा,
सूर्य आपण व्हावे लागते,

ओल्या मातीचा सुवास
असाच कधी दरवळत नाही,
प्रेमाच्या बेभान वर्षावात स्वत:ला
आधी चिंब भिजवावे लागते,

जेव्हा येतो वसंत बहरात
एक कळी तेव्हाच फुलते,
होतो जेव्हा प्रेमाचा शिडकावा
धुंदीत रहाण्याची गरजच नसते,

हळुच उमटलेला मनातला तरंग
ओठांवर येऊन परत जातो,
जिवलगाला बंधात कायमचे बांधायला
बेफाम खळबळच उमटावी लागते,

मैत्रीच्या नाजुक नात्यावर
येऊ नये कधी नैराश्याचा अंधार,
म्हणुन आनंदाच्या हळुवार क्षणांना
"मैत्रा" साठी नेहमीच मात्र जपावे लागते

तुझे येणे

आनंद उवाच.....................

तुझे येणे असे वसंताची बहर,
फुलुन येई स्वप्नांचा गुलमोहर,

हास्य तुझे खुलवे आसमंत सारा,
फुलुन जाई माझ्या मनाचा पिसारा,

नाचरे भाव डोळयातले तुझ्या,
गोडशी कळ उठवे हृदयात माझ्या,

जवळ नसताना तु, होई जीवाची तळमळ,
मनातल्या मोहोराची सुरु होई पानगळ,

वसुन जा अंतरात जन्मजन्मांतरीसाठी,
प्रत्येक क्षण जगत राहीन तुझ्यासाठी,
फक्त तुझ्यासाठी...................

स्व-शोधन

आनंद उवाच.....................

खोली अथांग डोहाची
काठावर बसुन उमजत नाही,
कृतीशीलतेच्या उड्डाणाविण
क्षितिजसीमा समजत नाही,

पूर्वग्रहांनी अतिमती मात्र
सदैवसा ग्रासलेलाच असतो,
आत्मस्तुती अन अभिमानातच मग्न
अज्ञानकर्दमात फसलेला असतो,

नको समजुस उथळता,
बालपणीच्या अवखळतेला,
समयच देई गंगास्वरुप
अवखळ अल्लड अलकनंदेला,

ज्ञानचक्षु उघडण्यासाठी
पूर्वग्रह असतो मोठा अडसर,
अतीबुद्धीभ्रमास देउन फाटा
घ्यावा "स्व"शोधनाचा प्रत्येक अवसर...................

Wednesday, June 8, 2011

एकटाच उरलो मी

आनंद उवाच.................

आभाळ फाटलेले, विटलेले
टाका भरण्यास फिरलो मी
वाहुन पुसुन गेल्या रेघा,
वाळुत एकटाच उरलो मी

शोधताना धागा सुखाचा
गुंतती शत धागे क्लेशाचे
आयुष्याचे वस्त्र विणताना
कसा नकळे विरलो मी

आसावल्या मनास माझ्या,
माझाच कसा तो राग येई
समजुतींचे गोफ बांधताना,
मध्यान्हीतच पुरा सरलो मी

जगणे हे बंदीशालेसम ,
सारेच रस्ते चुकलेले,
चक्रव्युही जगण्याच्या या
बेभान होऊन शिरलो मी

अपेक्षांचे डोईजड ओझे
अन आठवांचा अनंत लोंढा
गिळुन गेले संपवुन सगळे ,
जाणिव नेणिव विस्मरलो मी

पीडा सांगु कशी कुणाला ,
सारेच गांजले "स्व"त्वात
पचवुन हलाहल मिथ्याचे
होण्यास निळकंठ झुरलो मी

नेमेची उगवे चंद्र हा अर्धाच,
विसरुन चांदणे दुरवर कोठे
ध्रुवशोधाच्या आंधळ्या प्रवासात,
अडखडत धडपडत पुरलो मी...................................................