Tuesday, November 15, 2011

सावली


आनंद उवाच................................

मदत हवी आहे मला , मदत देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

कशी , कुठे हरवली, कधी कळलेच नाही
का कुठे विसरुन आलो, गमलेच नाही
काय गमवले आहे हे समजुन घेता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

साधी भोळी बिचारी तरीही होती थोडी वेगळी
अहोरात्र , जिवश्चकंठश्च जोडीदार असे ती आगळी
दुर्लभच अशी साथ मिळणे, कळुन घेता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

काय प्रमाद घडला माझा, रुसुनी असे लपुन जावे?
का ते चिडावे मजवरी, मज हताश सोडुन जावे?
कसे करावे पातकमार्जन उपदेश देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?


नकोसे झाले आहे मजला तिच्याविना व्यर्थसे जगणे
पार गर्तेत जावे आयुष्य जसे शुन्य शुन्यास भागणे
हरवले आहे माझे प्राण, गवसुन देता का जरा?
सावली हरवलीये माझी, शोधुन देता का जरा?

Friday, October 14, 2011

सोनपरीचा बाप


आनंद उवाच..................

चुकुन प्रेमात पडुन असाच
असा कसा भिजुन गेलो?
अडकुन या लग्नाच्या बेडीत
नकळत कसा विझुन गेलो!!!!!

पुर्वी जगणे हा छंद होता,
स्वप्नांना कसला धरबंध नव्हता,
स्वप्न कसले, कसले सत्य आता
जगण्याच्या क्लेशात थिजुन गेलो

नाही स्वार्थ परमार्थांची सांगड
कटकट नाही, नाही भानगड
अनंत गुंते, गहाळ उलगड,
संसारास्तव वैराग्याला त्यजुन गेलो

परतीचा मार्ग हरवुन गेला
नक्षत्राचे देणे मात्र देउन गेला
नवे सोनेरी विश्व ठेउन गेला,
सोनपरीचा बाप म्हणुनी सजुन गेलो

Friday, September 30, 2011

सखी

आनंद उवाच........................

सखीला सांगतो मी मनातल्या गोष्टी ,
काही उघड , काही लपलेल्या,
हिशोब देतो त्या मोहाच्या क्षणांचा ,
काही धरलेल्या , काही सोडलेल्या,

सखीशी उघडतो, स्वप्ने मनातली,
काही अस्फुट, काही भंगलेली,
काही भावनेत भिजुन विझलेली,
काही आशेत मनसोक्त रंगलेली,

सखीशी आहे एक अतुट बंधन,
अनवट नाजुक क्षणांनी सांधलेले,
अभंग अनादी अनंतश्या,
सुख दु:खाच्या दोऱ्याने बांधलेले,

दिशाहीन भरकटलेल्या तारुस माझ्या ,
असतो फक्त सखीचाच किनारा,
असहाय्यश्या , हताशलेला मनाला,
सखीच असते मनाचा ध्रुव तारा..........................

Thursday, September 29, 2011

तुझी अबोली


आनंद उवाच..................

तुझी अबोली
बाभुळ वाटे
जगण्यावर या
काळमेघ दाटे

तुझी अबोली
फक्त एकांत
प्रत्येक क्षण
वाटे युगांत

तुझी अबोली
राग धुमसता
मम मनाचा
छ्ळवाद नुसता

तुझी अबोली
दिशाहीन वारा
खग्रास ग्रहणी
सुर्यचंद्रतारा

तुझी अबोली
कधी फुलणार?
झोपाळ्यावाचुन
कधी झुलणार???

Tuesday, August 16, 2011

माया

आनंद उवाच.............



माया - एकच शब्द असे हा खुप आगळा,

यात न अडकलेला असे एखादाच वेगळा,


कधी असतो हा विविध रंगाढंगाचा बाजार,

कधी असतो हा कमजोर मनाचा गंभीर आजार,


मन भिडणारा कधी स्पर्श हा हळव्या ममतेचा,

कधी घेई जीव, हुंकार पाषाणहृदयी स्वार्थाचा,


कधी असतो "सुंदरम" चा निरागस मोह,

कधी होऊन जातो विकारांचा कर्दमडोह,


मोक्षाची आस कधी , तर कधी सुखाची अभिलाषा,

कधी कधी फक्त उरते ती "अर्था" ची परिभाषा,


अगम्यसे कूट असे ही अनादि अनंत निसर्गाची किमया,

बांधुन ठेवी मनुजास मोहाशी कायम , अशी ही माया,

अशी ही माया...............................

Saturday, June 11, 2011

चांदणे पांघरलेले आकाश

आनंद उवाच...............

चांदणे पांघरलेले आकाश
मागुन कधीच मिळत नसते,
दुसऱ्याला आशाकिरण देणारा,
सूर्य आपण व्हावे लागते,

ओल्या मातीचा सुवास
असाच कधी दरवळत नाही,
प्रेमाच्या बेभान वर्षावात स्वत:ला
आधी चिंब भिजवावे लागते,

जेव्हा येतो वसंत बहरात
एक कळी तेव्हाच फुलते,
होतो जेव्हा प्रेमाचा शिडकावा
धुंदीत रहाण्याची गरजच नसते,

हळुच उमटलेला मनातला तरंग
ओठांवर येऊन परत जातो,
जिवलगाला बंधात कायमचे बांधायला
बेफाम खळबळच उमटावी लागते,

मैत्रीच्या नाजुक नात्यावर
येऊ नये कधी नैराश्याचा अंधार,
म्हणुन आनंदाच्या हळुवार क्षणांना
"मैत्रा" साठी नेहमीच मात्र जपावे लागते

तुझे येणे

आनंद उवाच.....................

तुझे येणे असे वसंताची बहर,
फुलुन येई स्वप्नांचा गुलमोहर,

हास्य तुझे खुलवे आसमंत सारा,
फुलुन जाई माझ्या मनाचा पिसारा,

नाचरे भाव डोळयातले तुझ्या,
गोडशी कळ उठवे हृदयात माझ्या,

जवळ नसताना तु, होई जीवाची तळमळ,
मनातल्या मोहोराची सुरु होई पानगळ,

वसुन जा अंतरात जन्मजन्मांतरीसाठी,
प्रत्येक क्षण जगत राहीन तुझ्यासाठी,
फक्त तुझ्यासाठी...................

स्व-शोधन

आनंद उवाच.....................

खोली अथांग डोहाची
काठावर बसुन उमजत नाही,
कृतीशीलतेच्या उड्डाणाविण
क्षितिजसीमा समजत नाही,

पूर्वग्रहांनी अतिमती मात्र
सदैवसा ग्रासलेलाच असतो,
आत्मस्तुती अन अभिमानातच मग्न
अज्ञानकर्दमात फसलेला असतो,

नको समजुस उथळता,
बालपणीच्या अवखळतेला,
समयच देई गंगास्वरुप
अवखळ अल्लड अलकनंदेला,

ज्ञानचक्षु उघडण्यासाठी
पूर्वग्रह असतो मोठा अडसर,
अतीबुद्धीभ्रमास देउन फाटा
घ्यावा "स्व"शोधनाचा प्रत्येक अवसर...................

Wednesday, June 8, 2011

एकटाच उरलो मी

आनंद उवाच.................

आभाळ फाटलेले, विटलेले
टाका भरण्यास फिरलो मी
वाहुन पुसुन गेल्या रेघा,
वाळुत एकटाच उरलो मी

शोधताना धागा सुखाचा
गुंतती शत धागे क्लेशाचे
आयुष्याचे वस्त्र विणताना
कसा नकळे विरलो मी

आसावल्या मनास माझ्या,
माझाच कसा तो राग येई
समजुतींचे गोफ बांधताना,
मध्यान्हीतच पुरा सरलो मी

जगणे हे बंदीशालेसम ,
सारेच रस्ते चुकलेले,
चक्रव्युही जगण्याच्या या
बेभान होऊन शिरलो मी

अपेक्षांचे डोईजड ओझे
अन आठवांचा अनंत लोंढा
गिळुन गेले संपवुन सगळे ,
जाणिव नेणिव विस्मरलो मी

पीडा सांगु कशी कुणाला ,
सारेच गांजले "स्व"त्वात
पचवुन हलाहल मिथ्याचे
होण्यास निळकंठ झुरलो मी

नेमेची उगवे चंद्र हा अर्धाच,
विसरुन चांदणे दुरवर कोठे
ध्रुवशोधाच्या आंधळ्या प्रवासात,
अडखडत धडपडत पुरलो मी...................................................

Monday, April 25, 2011

जगणे

आनंद उवाच..........

जगणे ही पण एक कला असे
साजिरं पीसही सहज शिकवतं
पाचोळ्यात हरवण्यापरीस ते
झुळुकेवर अलगद उडुन दाखवतं


बुडणे ओंजळीतल्या सागरात
जगणे जगणाऱ्याला नसते ज्ञात
अथांग अगम्याचं वेडच वेडं
ते वेडच जगणाऱ्याला जगवतं

चांगल्या वाईट आठवणी
इंधन जगणे जगणाऱ्याचं
अस्तित्वही त्याचं उमलवे कलिका
चित्तधुंदसा सुगंध पसरवतं

Wednesday, April 6, 2011

अडलेच नव्हते

आनंद उवाच.....................................

माझे कधी कुणावाचुन अडलेच नव्हते
अडण्यास मजपाशी काही उरलेच नव्हते

निशांत अवकाश निरंतर जिवलग माझा
प्रकाशित आकाश कधी पुरलेच नव्हते

प्रेमास कुणाच्या होऊ कसा पात्र मी?
"मी" पलिकडे मला काही स्मरलेच नव्हते

आणु कशी खोली जीवनात या माझ्या?
बहरदार काव्यांचे गुंफण कधी स्फुरलेच नव्हते

सुखाचा नवा सदरा कश्यासाठी आणावा?
फाटके नेसुचे अजुन विरलेच नव्हते................