Thursday, September 24, 2009

पहिले प्रेम

पाचवीत असताना मुंबईला आलो. नवी शाळा, पहिलाच दिवस, सगळेच नवे नवे वाटत होते. आईबरोबर शाळेच्या मैदानात उभा होतो. दुर एका कोपऱ्यात ती उभी होती. गर्दीमध्ये सहज लक्ष जाईल असा तेजस्वी चेहरा, सुबक ठेंगणी मनात भरेल अशी मुर्ती. शाळेची घंटा वाजली आणि आईला हात दाखवुन मी माझ्या वर्गाकडे निघालो.सहज मागे वळुन पुन्हा तो चेहरा दिसव म्हणुन त्या कोपऱ्याकडे व्यर्थ नजर फिरवली अन माझ्या वर्गाकडे जाणारा जिना चढू लागलो. पुढे बरेच दिवस पुन्हा काही तो चेहरा दिसलाच नाही. हळुहळु विस्मृतीत जाता जाता एक दिवस अचानक शाळा सुटताना ती पुन्हा समोर आली. आज तिच्याबरोबर तो ही होता. तो माझ्याच वर्गात होता. त्याला तिच्या बरोबर पाहुन बरेही वाटले अन थोडी नाखुशीही. माझी त्याच्याशी अजुन तेवढी मैत्री झाली नव्हती. पण तिला पाहुन आज एक नवी जाणिव झाली होती. ह्रुदय जरा जास्तच धडधडत होते. मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती. मला नक्की अर्थ कळत नव्हता पण सगळेच काही विचित्र अन वेगळेच वाटत होते. जाऊन बोलायचा काही धीर होत नव्हता. पाचवीचे वर्ष असेच संपले. निकालाचा दिवस. वर्गात या वर्षी मी तिसरा आलो होतो. नवा नवा आलो अन तिसरा क्रमांक मिळवला म्हणुन समस्त शिक्षक मंडळी माझ्या आईशी बोलत होते. माझी नजर मात्र ती कुठे दिसते आहे का ते शोधत होती. दुर कुठे तरी मला ती दिसली. पण आईची निघायची घाई. गेलो बापडा घरी. सहावीचे वर्ष असेच गेले नुसतेच दर्शन. कधी दुरुन तर कधी जवळुन ओझरता. पण आतापर्यंत तिचे चित्र मनात पक्के बसले होते. गोरा उभट चेहरा , नाजुक चाफेकळी नाक, घारसर पिंगट डोळे , रेखीव भिवया अन नाजुक जिवणी. जिवाला पार वेडं करुन सोडले होतं. नक्की काय होतय हे कळतच नव्हतं.सातवीत असतांना ओळख झाली. तो बरोबर होताच आणि आयुष्यात पहिल्यांदा मला कुणाशी बोलताना डोळ्यात नजर घालुन बोलणे किती अवघड असते ह्याची जाणिव झाली. पुर्णपणे मोहीत झाल्यावर माणसाची काय अवस्था होते अन बोलताना किती कसरत करावी लागते हे मला तेव्हा जाणवले. हळुहळु ओळख वाढत गेली. "त्या"च्या बरोबर घरी ये हे आमंत्रणही मिळाले. पण तोपर्यंत उमजुन चुकले होते की "ये मामला अपुन के पहुच के बाहर का है". म्हणुन काही मनातली हुरहुर थांबली नाही की भेटण्याची एकही संधी सोडली नाही. कारण त्तिची सर कुणाच्यातच नव्हती. दहावी झाली , आमचे रस्ते विस्तारित जगाकडे वळले अन तो व ती दोघेही विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागले. मध्ये सात आठ वर्षे गेली.

स्टेशनहून येताजाता तिच्या घराशी नजर उगाच रेंगाळायची. एका संध्याकाळी स्टेशनहून बाईकने घरी येत असताना तिच्या घराजवळ मला तो व ती उभे दिसले. तेच रुप अजुन एव्हढ्या वर्षांनी. काही बदल नाही. पुन्हा एक कळ उठली , जुन्या आठवणी जाग्या झाल्या व आपसुकच माझी बाईक त्यांच्याकडे वळली. नमस्कार चमत्कार झाले, त्याच्या इतर चांभारचौकश्या झाल्या. तिने हातात पट्कन लग्नाची पत्रिका ठेवली. आणि माझ्या लग्नाबद्दल चौकशी केली. मी ते बोलायचे टाळण्यासाठी सरळ निरोप घेतला. दोन वर्षापूर्वी पुन्हा स्टेशनजवळ मला ती भाजी घेताना दिसली. थोडासा वयस्कपणा मला पहिल्यांदा दिसला. मला पाहुन तेच चांदणे पसरवणारे ओळखीचे स्मितहास्य. पार विरघळुनच गेलो. थांबलो बोलायला. संपुर्ण वेळ त्याचा विषय. तो, त्याचा मुलगा , तो इथे असतो , तो हे करतो. मध्येच माझ्या लग्नाची पृच्छा. आणि लवकर छानशी मुलगी पाहुन लग्न करण्याबद्दल आग्रह. दीनवाण्या भावाने सगळे पचवत उभा होतो, तिथुन फुटायची संधी शोधत. आणि एकदम विषयाचा सुरच बदलला. तिचे सुनपुराण सुरु झाले आणि मी हतबल होऊन मान डोलावत त्याचा स्विकार करु लागलो.............


अरे हो मी सांगायलाच विसरलो सुरुवातीला, ती "त्या"ची आई होती.......................................